Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिपळुणात अथ श्रीरामायण कार्यक्रम उत्साहात

चिपळुणात अथ श्रीरामायण कार्यक्रम उत्साहात

चिपळूण (वार्ताहर) : बापट मंडळ चिपळूण आणि वाईल्डलाइफ अनलिमिटेड चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला अथ श्रीरामायण हा कार्यक्रम शनिवार दि. २४ व रविवार दि. २५ जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. वाल्मिकी रामायणाचे निरूपण आणि गीतरामायणातील सदाबहार गीते अशा स्वरूपातील या कार्यक्रमाचे उद्घाटन गीत रामायणाचे हजारो कार्यक्रम करणारे आणि गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर आणि युनायटेड इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिध्द यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तींचे पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
वाल्मिकी रामायण हे प्रमाण मानले जाते आणि म्हणूनच वाल्मिकी रामायणात प्रत्यक्षात काय सांगितले आहे याचे निरूपण मुळचे चिपळूणचे सुपुत्र असलेले व सध्या पुणे येथे वास्तव्य असलेले ह.भ.प. प्रणव बुवा गोखले यांच्या सुश्राव्य वाणीतून रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. निरूपण करताना आलेल्या प्रसंगावरील गीतरामायणातील सुधीर तथा बाबूजी फडके यांनी स्वरबद्ध केलेली सदाबहार गीते चिपळूण मधील गायक कलाकार सौ. मेघना गोखले, सौ उत्तरा भागवत- साडविलकर, कु. स्वरा भागवत रत्नागिरी, श् अनामय बापट, आशुतोष चितळे, यांनी गोड आवाजात सादर केली. याच कार्यक्रमात युनायटेड स्कूलच्या गुरुकुल विभागातील मुलांनी *नकोस नौके पार करू* आणि *सेतू बांधारे* *सागरी* ही दोन समूहगीते संगीत शिक्षक पराग लघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुरेल आवाजात सादर केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत नियोजन राहुल साडविलकर आणि दिलीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. राहुल साडविलकर कि-बोर्ड, कु. श्रावणी संकपाळ कि-बोर्ड, दिलीप संकपाळ तबला, गंधार संकपाळ तबला, सौ. मंदा संकपाळ हार्मोनियम, अरविंद जोगले कु. चैतन्य जोगले आणि कु. आरूष कुडाळकर यांनी साईडरिदम यांची बहारदार साथ संगत केली. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओघवत्या व समयोचित शैलीत मंदार ओक यांनी केले. गीत रामायण ही केवळ गाणी नसून ती आपल्या जीवनाची संस्कृती आहे आणि ही संस्कृती संरक्षणाचा आणि संवर्धनाचं काम बापट मंडळासारख्या संस्था करीत आहेत हे अतिशय स्तुत्य आहे. प्रत्येक माणूस हा एक कलाकार असतोच फक्त त्याने आपल्यातील कला वेळीच ओळखून तिचा विकास केला पाहिजे. त्यामुळे कला तर वृद्धिंगत होईलच आणि संस्कृती जतनाचे कार्यही घडेल, असे प्रतिपादन आनंद माडगूळकर यांनी उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी बोलताना आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
राम जन्मला ग सखे राम जन्मला या गीताच्या वेळी उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांना आणि सर्व उपस्थिताना पेढा देऊन सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. पेढा देण्याची ही अनोखी कल्पना श्री अविनाश पोंक्षे यांची होती. समारोपाच्या वेळी रथसप्तमी असल्याकारणाने सर्वांना तिळगुळ देण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही श्री ओंकार बापट चिपळूण यांची होती आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम सुंदररित्या साकार झाला. या कार्यक्रमासाठी अनेक बापट बंधू हितचिंतकांनी मदत केली होती. पहिल्या दिवशी उद्घाटनासह सुमारे पाच तास व दुसऱ्या दिवशी चार तास असा एकूण दोन्ही दिवस मिळून नऊ तासाचा सलग कार्यक्रम चिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पाचशेच्या वर श्रोत्यांनी उपस्थिती लावून अधिक उंचीवर नेला. बापट मंडळाचे पांडुरंग श्रीराम बापट, मंगेश बापट, श्रीकांत तथा भाऊ बापट, शशांक बापट, आनंद मधुकर बापट, सौ. मृण्मयी ओंकार बापट, सौ. अनुश्री बापट तसेच सौ अनुराधा चांदोरकर व सतीश चांदोरकर, निशिकांत कानिटकर, सौ. छाया पोटे, संकेत हळदे, संतोष केतकर आदी मंडळीनी अपार मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला. संपूर्ण थिएटर संयोजन योगेशजी कुष्टे आणि सहकारी यांनी मिळून केले होते. युनायटेड गुरुकूल च्या मुलांनी कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे स्वयंसेवक म्हणूनही काम केले. असा हा गीत रामायण आणि वाल्मिकी रामायण यावर आधारित असलेला आगळावेगळा कार्यक्रम सुंदर रित्या संपन्न झाला. बापट मंडळ आणि वाईल्ड लाईफ यांनी सामाजिक कर्तव्य म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि यापुढेही असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. अशी ग्वाही रसिक श्रोत्यांना दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments