गुहागर (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व गुहागर-रत्नागिरीला जोडणाऱ्या राई-भातगाव पुलाचे खूप कौतुक करण्यात आले. मात्र, तितकाच प्रवासाच्यादृष्टीने सोयीचा ठरणारा व दापोली-गुहागरला जोडणाऱ्या पुलाचे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे. या पूल उभारणीच्या केवळ राजकीय वल्गनाच ठरलेल्या असून स्थानिक लोकप्रतिनिधींसह शासन जबाबदार असल्याचा आरोप जनतेने केला आहे. गेले अनेक वर्ष गुहागर-दापोली हे दोन तालुका जोडण्यासाठी लोकप्रतिनिधींबरोबरच शासनही प्रयत्नशील होते. मात्र, ते आजतागायत अपयशी ठरले आहे. मागील कॉग्रेस पणित केंद्र सरकारने आणि त्या आधीही ज्यांनी-ज्यांनी सत्ता हातात मिळाल्यानंतर रस्ते जोड प्रकल्प, नद्या जोड प्रकल्प असे अनेक प्रकल्प फक्त हातीच नव्हे तर कागदावरही घेतले होते. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कीती प्रमाणात झाली हा प्रश्न जनतेला आजही सतावीत आहेच. याच अनुषंगाने दापोली तालुका आणि गुहागर तालुका जोडण्याचा मनसुबा तत्कालीन सरकारने जाहीर केला होता. परंतू आजपर्यंत फक्त याविषयीच्या वल्गनाच करण्यात येत असून प्रत्यक्ष कार्यवाही होतच नसल्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले प्रत्येक सरकार हे मग ते कोणत्याही पक्षाचे असो ते निष्क्रियच असल्याचे या दोन तालुक्यांतील जनतेच्या निदर्शनास येत आहे. जवळपास २५ वर्षापासून गुहागर आणि दापोली हे दोन तालुके जोडण्याची कल्पना होती. परंतू आजपर्यंत राज्याच्या कारभार करणार यांनी ही योजना अंमलात आणली नाही याचे कारण काय असेल ते फक्त राजकारण्यांनाच माहीत असेल, पण या दरम्यान या दोन तालुक्यांचा मिलाप घडविण्यासाठी डॉ. मोकल यांना फेरीबोटसाठी परवाना देण्यात आला. त्यामुळे या तालुक्यात आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुंबई मार्गे येणाऱ्या पर्यटकांचा मार्ग अतिशय सुखकर झाला. मुंबईकडून येणारे पर्यटकांना पेण, पनवेल, महाड, खेड, चिपळूण असा प्रवास करून यावे लागते. त्यामध्ये इंधनही वाया जातेच आणि विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. गुहागर-दापोली या दोन तालुक्यांना जोडणारा पुल आजही प्रस्तापितच आहे. परंतू त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी कुणीही मनापासून लक्ष घालीत नसल्याने ही खेदजन्य बाब आहे. गुहागर तालुक्यातील परचुरीतून फरारे-उन्हवरे असा हायवे होणार होता. पण तोही फोल ठरला. धोपावे आणि दाभोळ या दोन गावांमध्ये भली मोठी खाडी आहे. याच खाडीवर पुल बांधण्याचे ठरवून हे दोन तालुके जोडण्याचा बेत होता. परंतु यापैकी शासनाचा कोणताच मानस पूर्ण झालेला नाही त्याऐवजी तेथे जेटी बांधून फेरीबोट करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या खाडीवर पुल झाल्यास मुंबई-गोवा महामार्गाने जाणाऱ्या प्रवाशांचे अंदाजे ५० ते ६० किमी.चे अंतर वाचेल. हे स्थानिक लोकप्रतिनिधींना ठाऊक असूनही समाजकारणातही राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर या दोन तालुक्यातील जनतेचा रोष आहे. महाराष्ट्राच्या शासनाने गेल्यावर्षीच २२ नविन ठिकाणी पर्यटनस्थळे म्हणून घोषीत केली. त्यामध्ये गुहागर आणि रत्नागिरी ही दोन ठिकाणे आहेतच. परंतू या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी सुयोग्य मार्ग आणि मुबलक सुविधा उपलब्ध करून देण्यात मात्र राज्यशासन आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ कमकुवत सिध्द होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आणि गुहागर तालुक्यामध्ये येणारे पर्यटक निराशा व्यक्त करत आहेत. या पुला संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी खाडीच्या दोन्ही बाजूनी सॉईल टेस्टिंग केले होते. मात्र त्यानंतर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गुहागर-दापोली या दोन तालुक्यांना जोडणारा पुल झाल्यास गुहागर तालुक्यामध्ये पर्यटन वाढीस जावून तालुक्याचा आर्थिक दर्जा नक्कीच उंचावेल. परंतु या बाबीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी मनापासून लक्ष पुरविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे
गुहागर-दापोली जोडपुलाच्या फक्त वल्गनाच! स्थानिक लोकप्रतिनिधीसह शासन जबाबदार, जनतेचा आरोप
RELATED ARTICLES



