Saturday, May 2, 2026
Google search engine
Homeकोकणरत्नागिरीत लाचखोर तलाठ्याला रंगेहात अटक; ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी स्वीकारली १० हजारांची...

रत्नागिरीत लाचखोर तलाठ्याला रंगेहात अटक; ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी स्वीकारली १० हजारांची लाच

रत्नागिरी: प्रतिनिधी

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत महसूल विभागातील एका भ्रष्ट अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. जमिनीच्या ७/१२ उताऱ्यामध्ये फेरफार करून नाव दाखल करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चाफे (ता. रत्नागिरी) येथील तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५१) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

नेमकी घटना काय?
तक्रारदार यांनी रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथे १० गुंठे बिनशेती जागा खरेदीखताद्वारे विकत घेतली होती. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर फेरफार करून स्वतःचे नाव लावण्यासाठी त्यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी चाफे येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, हे काम करण्यासाठी आणि फेरफार नोंद असलेला ७/१२ उतारा देण्यासाठी तलाठी बजरंग चव्हाण यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

सापळा आणि कारवाई
लाचेच्या मागणीनंतर तक्रारदाराने ३१ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडे धाव घेतली. या तक्रारीची दखल घेत विभागाने १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी पडताळणी केली. यावेळी चव्हाण यांनी १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यानंतर पथकाने चाफे येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना बजरंग चव्हाण यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. चव्हाण हे सध्या ओम शांती अपार्टमेंट, नाचणे (रत्नागिरी) येथे राहत असून, त्यांचे मूळ गाव कोणेगांव (ता. कराड, जि. सातारा) आहे.

पोलीस पथकाची कामगिरी
ही धडाकेबाज कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक मच्छिद्र जाधव, सहाय्यक फौजदार उदय चांदणे, पोलीस हवालदार दीपक आंबेकर, श्रेया विचारे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, समिता क्षीरसागर आणि वैशाली धनवडे यांच्या पथकाने केली.

दरम्यान कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments