Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*दिव्यांगांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; उक्ताड परिसरातून रस्त्याच्या पॅचवर्कला सुरुवात*

*दिव्यांगांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; उक्ताड परिसरातून रस्त्याच्या पॅचवर्कला सुरुवात*

चिपळूण (प्रतिनिधी) : उक्ताड बायपास ते रिगल कॉलेज दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची झालेली दुरवस्था, वाढलेले खड्डे आणि त्यातून उद्भवणारा अपघाताचा धोका यामुळे परिसरातील नागरिकांसह दिव्यांग बांधव-भगिनींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. वारंवार निवेदन देऊनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत दिव्यांग सेवा संस्थेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने बुधवारपासून डांबराने पॅचवर्कच्या कामाला सुरुवात केली आहे.
उक्ताड बायपास ते रिगल कॉलेज हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून शैक्षणिक संस्था, बाजारपेठ व निवासी भागांना जोडणारा मुख्य दुवा आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. विशेषतः दिव्यांग नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. दुचाकीस्वार दिव्यांगांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर दिव्यांग सेवा संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटेकर, उपाध्यक्ष संतोष होळकर, सचिव अशोक भुस्कुटे, सहखजिनदार ओंकार साळवी, मिरजोळीचे सामाजिक कार्यकर्ते विनोद हिरे तसेच सामाजिक कार्यकर्त्या स्वाती भोजने यांनी काही दिवसांपूर्वी उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण यांना लेखी निवेदन दिले होते. तातडीने डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत करावा, अन्यथा दिव्यांग संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता. दिव्यांगांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत संबंधित ठिकाणी डांबराने पॅचवर्क करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
“आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासन हलले आणि कामाला सुरुवात झाली, ही सकारात्मक बाब आहे. मात्र केवळ पॅचवर्क न करता कायमस्वरूपी दर्जेदार डांबरीकरण करावे,” अशी अपेक्षा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी संपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण व पुनर्बांधणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेले काम तात्पुरते असले तरी यामुळे अपघाताचा धोका कमी होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुढील काळात ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत चिपळूणकरांनी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments