Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*कोकणात तापमानाचा पारा वाढणार*

*कोकणात तापमानाचा पारा वाढणार*

रत्नागिरी: (प्रतिनिधी) येत्या काही दिवसांत कोकणात तापमानाचा पारा हळूहळू वाढण्याची शक्यता असून, रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वाचा कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी २०२६ रोजी हा सल्ला प्रसिद्ध करण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, २५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही. या काळात कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. हवेतील आर्द्रता ७७ ते ८२ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज असून, २५ फेब्रुवारी रोजी आकाश अंशतः ढगाळ, तर त्यानंतर मुख्यत्वे निरभ्र राहील. बागायतदारांसाठी महत्त्वाच्या सूचना वाढत्या उष्णतेचा विचार करता पिकांना गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंबा व काजू: आंबा आणि काजूच्या ज्या झाडांना फळधारणा झाली आहे, अशा झाडांना दर १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. आंबा काढणीच्या एक महिना आधी पाणी देणे बंद करावे. आंब्यावरील तुडतुडे रोखण्यासाठी मोहोर संरक्षण वेळापत्रकाप्रमाणे फवारणी करावी, मात्र परागीभवनाच्या काळात फवारणी टाळावी. नारळ व सुपारी: ५ वर्षांवरील नारळाच्या माडांना खतांची तिसरी मात्रा देऊन तातडीने पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या सुपारी व नारळ रोपांना तीव्र उन्हापासून वाचवण्यासाठी शेडनेट किंवा झावळ्यांनी सावली करावी. कलिंगड: कलिंगडाची फळे प्रखर उन्हामुळे खराब होऊ नयेत म्हणून ती भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून ठेवावीत. पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन वाढत्या उष्णतेमुळे पशुधनाला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जनावरांना दिवसभर पुरेसे थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. दुपारच्या तीव्र उन्हात जनावरांना चरावयास बाहेर सोडू नये आणि शक्य असल्यास गोठ्यात ‘फॉगर’ लावून तापमान नियंत्रित ठेवावे. कुक्कुटपालनामध्ये पक्ष्यांना उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी शेडच्या छतावर गवत किंवा नारळाच्या झावळ्यांचे आच्छादन करावे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विद्यापीठ केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तज्ज्ञ समितीमार्फत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments