चिपळूण : कोकणातील पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारा शिमगा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. गावागावांत ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि ग्रामदैवतांच्या पालख्या यामुळे वातावरण भक्तिमय झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) नेते व गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावाला भेट देत ग्रामस्थांसोबत शिमगा उत्सवात सहभाग नोंदवला. ग्रामदेवता श्री शारदादेवीच्या पालखीला खांदा देत त्यांनी पारंपरिक पद्धतीने नृत्य केले. त्यांच्या सहभागामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पालखी मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘शारदामातेच्या जयघोषा’त संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी त्यांचे चिरंजीव व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तसेच विद्यमान सदस्य विक्रांत जाधव, माजी नगरसेवक समीर जाधव, तसेच योगेश जाधव, सिद्धेश जाधव आणि सुहास जाधव हेही उत्सवात सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी जाधव कुटुंबीयांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. शिमगा हा कोकणातील सामाजिक ऐक्य आणि परंपरेचे प्रतीक मानला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकोप्याची भावना दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे तुरंबव गावात आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
खांद्यावर पालखी अन् ग्रामदेवतेला नमन! आमदार भास्करराव जाधव यांनी नाचवली श्री शारदादेवीची पालखी
RELATED ARTICLES



