Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहामार्गावरील खडीवरून मोटरसायकल घसरली; २५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

महामार्गावरील खडीवरून मोटरसायकल घसरली; २५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या खडीवरून मोटरसायकल घसरल्याने पाठीमागे बसलेली २५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी मोटरसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात २३ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथील कुंभारवाडी परिसरातील निरंकारी सत्संग मठाजवळ घडला. याबाबतची फिर्याद सचिन शिवाजी मदने (वय ३२, मूळ रा. सुभाषनगर, माळगाव रोड, मिरज, जि. सांगली; सध्या रा. कोट, ता. लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेतील संतोष शिवाजी मदने (वय २५, मूळ रा. सुभाषनगर, माळगाव, मिरज, जि. सांगली) हा आपल्या प्लॅटिना बजाज मोटरसायकल (क्रमांक एमएच १० ईयू ७२८२) वरून कोट ते लांजा असा प्रवास करत होता. त्याच्या पाठीमागे सविता सचिन मदने (वय २५) आणि तिचा तीन वर्षीय मुलगा सार्थक असे दोघे बसले होते. मोटरसायकल कुंभारवाडी येथील निरंकारी सत्संग मठाच्या मागील उताराजवळ आली असता रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या खडीवरून घसरली. त्यामुळे पाठीमागे बसलेली सविता मदने यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी सांगली-मिरज येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मोटरसायकलस्वार संतोष मदने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ)(ब), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments