मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचा शिरगाव येथे सत्कार
चिपळूण (राज पिलके ) : तालुक्यातील शिरगाव गावचे सुपुत्र मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी गावच्या सर्वांगीण विकासाठी नेहमी कटिबद्ध राहण्याचे अभिवाचन प्रभाकरराव शिंदे यांनी दिले. यावेळी त्यांनी भरत लब्धे यांच्याशी आपले कौटुंबिक संबंध कसे आहेत याचा दाखला दिला तर राजकारण विरहित काम केल्यास आपल्या गावचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे भाष्य केले. यावेळी आई महाकाली देवीची यात्रा, जन्मदिवस आणि स्थायी समितीचे अध्यक्ष पद आपल्याला त्यादिवशी मिळाले यातच स्वतःला भाग्यवान समजतो असे मत व्यक्त करीत भरत लब्धे यांचे कौतुक केले. शिरगाव गावचे सुपुत्र प्रभाकर शिंदे हे मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष झाल्यावर शिमगा सणासाठी गावी आले होते, यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांच्या निवासस्थानी सत्कार समारंभ पार पडला. यावेळी शिरगाव सोसायटी चेअरमन जयंत शिंदे, चिपळूण माजी नगरसेवक राजू देवळेकर, शिरगाव शिक्षक प्रसारक संस्था प्रभारी अध्यक्ष नितीन शिंदे, महेंद्र शिंदे, प्रदीप शिंदे, व्यापारी मंडळ अध्यक्ष प्रकाश लब्धे, निलेश नारकर, केशव लांबे, हभप लक्ष्मण जाधव आदीसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नगरसेवक राजू देवळेकर, शिरगाव सोसायटी चेअरमन जयंत शिंदे, शिरगाव प्रसारक संस्था प्रभारी अध्यक्ष नितीन शिंदे, पोलिस महेंद्र शिंदे, व्यापारी मंडळ अध्यक्ष प्रकाश लब्धे यांनी मनोगतातून प्रभाकर शिंदे यांच्या कामाचे कौतुक भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर काँगेस जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी ज्यावेळी ते प्रथम नगरसेवक झाले त्यावेळी भारत पाकिस्तान तणाव होता. हिंदू हृदयसाम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाकिस्तान सामना होऊ देणार नाही अशी गर्जना केली आणि सामन्याच्या आदल्या दिवशी आमदार शिशिर शिंदे यांच्या साथीने प्रभाकररावांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून टाकली. पाचवेळा नगरसेवक होणे साधी बाब नाही. यासाठी दांडगा जनसंपर्क व जनतेशी अतूट नाते आवश्यक असते. आता पंचक्रोशीतील विकासासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती केली तसेच कोयना प्रकल्पात येथील ठेकेदार कशा प्रकारे कामगाराची पिळवणूक करीत आहेत त्याकडे त्यांचे लक्ष केंद्रित केले तर आज बेरोजगारीचा प्रश्न सोडण्यासाठी प्रकल्प आला तर येथील तरुणाच्या हाताला काम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. शिरगाव शिक्षणं प्रसारक संस्था यांच्या माध्यमातून गावातील शाळा पुनर्जीवित करण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करीत लवकरच ठाणे नगरसेवक मनोज शिंदे आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचा मोठा सत्कार सोहळा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करून टाकले. मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी २००४ साली चिपळूण आमदारकीची निवडणूक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेमुळे लढलो त्यामध्ये पराभव झाला, त्याबाबत अनेकवेळा बोलले जाते पण मी निवडणुकीला उभा राहिलो आणि सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे समाधान झाले यातच मी भाग्यवान समजतो. यावेळी त्यांनी भरत लब्धे यांच्या कामाचे कौतुक केले. जरी ते दुसऱ्या पक्षाचे असले तरी आमच्यात एक कौटुंबिक नाते आहे आणि महिन्यातून अनेकवेळा विविध विषयावर आमची चर्चा होते तर गावातील विकासकामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. काल केलेली पाखाडी रस्ते दुसऱ्या दिवशी नादुरस्त होत असतील तर असली कसली विकास कामे असा सवाल उपस्थित करीत ४८ हजार कोटीत मला मुंबईचे अनेक विकासकामे करायची आहेत आणि ती जर उत्तमरित्या केली तर मुंबईकर आम्हाला डोक्यावर घेतील पण आज सांगतो आता भाजपाचे ८९ नगरसेवक निवडून आले आहेत, त्याहीपेक्षा जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या गावासाठी खूप काही करता त्यासाठी समिती गठीत करा आणि एक वज्रमुठ करा, राजकारण विरहित काम करा गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी आपल्या पाठीशी नेहमी उभा राहील अशा आश्वासन मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले. यावेळी आभार प्रदर्शन हभप लक्ष्मण जाधव यांनी केले.



