चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळंबस्ते फाटा येथे भरधाव वाहनाने धडक दिल्याची घटना घडली असून या अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे अपघात घडवून वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला आहे. ही घटना दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईकडून गोवा बाजूकडे जाणाऱ्या लेनवर, मौजे कळंबस्ते फाटा येथे काळ्या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा चारचाकी गाडी (नंबर अज्ञात) हयगयीने व भरधाव वेगात चालवली जात होती. या वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या निजामुद्दीन हसनअली शेख (वय ३६, रा. निरबाडे मोहल्ला, ता. चिपळूण) यांना जोरदार धडक दिली. या अपघातात निजामुद्दीन शेख यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. या प्रकरणी जखमीचे चुलत भाऊ अब्दुल रऊफ कुदबुद्दीन शेख (वय ४९, रा. निरबाडे मोहल्ला, चिपळूण) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दि. २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.३४ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कळंबस्ते फाट्यावर ‘हिट अँड रन’चा थरार पादचाऱ्यास गंभीर दुखापत, क्रेटा चालक पसार
RELATED ARTICLES



