चिपळूण (प्रतिनिधी) : कोयना अभयारण्यातील मध्यवर्ती सुरक्षित जंगलात सोडलेल्या हिरकणी वाघिणीचा संचार काडवली-केळणेच्या (ता. चिपळूण) जंगलात संचार होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत वनविभागाच्या सुत्रांनी दुजोरा दिला आहे. या संदर्भात सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या ‘मॉनिटरिंग सेंटर’कडून प्राप्त झालेल्या जीपीएस सिग्नलनंतर चिपळूण वनविभाग तातडीने सतर्क झाला आहे. पेच व्याघ्रप्रकल्पातील नागलवाडी परिक्षेत्रात ५ फेबुवारीला सायंकाळी पाच वाजता एसटीआर ०६ या वाघिणीला पकडून कोयना अभयारण्यात सोडण्यात आले. त्यानंतर या वाघिणीचा ऐतिहासिक मुक्त संचार सुरू झाला. या आधी एसटीआर ०३ हा ‘बाजी’ नर वाघ तसेच ‘तारा’ व ‘चंदा’ या वाघिणी दाखल आहेत. आता त्यांच्या जोडीला नवीन आणलेली ही एसटीआर ०६ म्हणजा ‘हिरकणी’ वाघीण कोयना वन्यजीव अभयारण्यात व्याघ्र प्रजननवृद्धीसाठी सोडण्यात आली आहे. कोयना अभयारण्यात सोडलेल्या ‘हिरकणी‘चा लोकेशन सिग्नल अवघ्या पाचव्या दिवशी नांदिवसेच्या डोंगराळ भागात आढळून आला. यानंतर मॉनिटरिंग सेंटरने चिपळूण वनविभागाला सावध केले. यानुसार वनाधिकाऱ्यांनी त्वरित पथकासह नांदिवसे येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी डोंगर परिसरात एकटे जाणे टाळावे, गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच रात्रीच्यावेळी विशेष सतर्कता बाळगावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तर आता काडवली, केळणे (ता. खेड) येथील जंगलात संचार आढळून आला आहे. तर जीपीएसद्वारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती समजताच वन विभागाच्या पथकाने येथील जंगल परिसर काढत हिरकणी वाघिणीच्या संचारावर लक्ष ठेवले आहे. तर काही दिवसांपूर्वी काडवली- निरबाडे नदीकिनारी हिरकणी वाघीण ग्रामस्थांना दिसून आली होती. या हिरकणी वाघिणीच्या संचाराबाबत येथील ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. याचबरोबर ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
हिरकणी वाघिणीचा काडवली-केळणे जंगलात मुक्त संचार
RELATED ARTICLES



