रामपूर येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर
SCON PRO स्कॉन प्रो फाउंडेशनचा समाजोपयोगी उपक्रम
चिपळूण (संतोष पिलके ) : दृष्टी ही जीवनाची अमूल्य देणगी असून ती
जपण्यासाठी वेळेवर तपासणी व उपचार आवश्यक असतात. याच उद्देशाने SCONPRO फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ SCON PRO आणि शं. ना. चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रामपूर येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हा उपक्रम कोकणचे सुपुत्र तथा SCON उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारत असून, समाजहितासाठी उचललेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. “मानवतेला बळकट करणे” या ब्रीदवाक्यानुसार SCON PRO कडून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.
मोतीबिंदू हा वाढत्या वयाबरोबर होणारा डोळ्यांचा सामान्य आजार असून, वेळेवर उपचार न झाल्यास दृष्टी कमी होण्याची अथवा अंधत्वाची शक्यता असते. विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये आजही अनेक नागरिकांना डोळ्यांची तपासणी व शस्त्रक्रिया करणे परवडत नाही. हीच गरज ओळखून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात अनुभवी व तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञांकडून मोफत डोळ्यांची तपासणी, तसेच गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित उपचार पद्धती अवलंबल्या जाणार असून तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन दिले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक व समाजातील वंचित घटकांना या शिबिराचा विशेष लाभहोणार आहे.
हे शिबीर दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, रामपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. नोंदणीसाठी 9112138989 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेची तारीख ही प्रत्यक्ष तपासणीनंतर कळवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. “आजच तपासणी करून घ्या… उज्ज्वल दृष्टीव पाऊल” असे आवाहन आयोजकांनी नागरिकांना केले आहे.



