काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ; नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार लियाकत शाह भाजपच्या वाटेवर
चिपळूण : तालुक्याचे माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष व नुकत्याच झालेल्या चिपळूण शहर नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार लियाकत शाह हे भाजपच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. भाजपचे नेते प्रशांत यादव प्रतिवर्षी आयोजित करत असलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिपळूण मध्ये येणार असल्याचे बोलले जात आहे.त्याच वेळी लियाकत शाह हे आपल्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरामध्ये ऐकण्यास येत आहेत.
लियाकत शाह गेले अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम करत होते. दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेसकडून चिपळूण नगरसेवक, उपनगराध्यक्ष आदी पदे भुषवली आहेत.मात्र नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये लियाकत शाह यांनी आपल्याला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी पासून काँग्रेसने डावल्याचा आरोप करून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती.यामुळे काँग्रेसकडून त्यांना शिस्तभंगाची कारवाई म्हणून हकालपट्टी केली होती.
लियाकत शाह हे भाजप विरोधी म्हणून चेहरा असतानाच काँग्रेसच्या विद्यमान जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये लियाकत शाह हे भाजपला समांतर (स्लीपिंग सेल ) काम करत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती .असे असतानाच आता निवडणुका झाल्यानंतर लियाकत शाह हे आपल्या राजकीय पुनर्वसन चाचपणी करताना दिसून येत आहेत. लियाकत शाह यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांना पराभवाला सामोरे जावे लागले असे देखील निकालानंतर मोठ्या स्वरूपात चर्चांना ऊत आला होता. याला कारण रमेश कदम जेवढ्या मतांनी पराभूत झाले तेवढीच मते लियाकत शाह यांना प्राप्त झाली होती. यामुळे लियाकत शाह यांना उभे लरून रमेश कदम यांना पराभूत करण्यासाठी कुणीतरी चाल खेळली असे देखील बोलले जात आहे. अशा पार्श्वभूमीवर जर लियाकत शाह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर निवडणुकीपूर्वी ज्या काही विविध चर्चा रंगल्या होत्या त्यांना कुठेतरी संदर्भ यानिमित्ताने मिळणार आहे. यामुळे कट्टर काँग्रेस मतप्रवाहाचा एक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाल्यास राजकीय वातावरण ढवळून निघणार असल्याचे बोलले जात आहे.



